संगमेश्वर:- मुंबई – गोवा महामार्गावर आरवली ते बावनदी दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम करताना मशिनचे पाईप फिटींग करत असताना अंगावर दरड कोसळून गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार २५ मार्च रोजी घडली. अर्जुन अजय आदिवासी (२१, रामपूर, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन आदिवासी हा वांद्री येथे मामेभाऊ नरेंद्र आदिवासी याच्यासोबत मशिनचे पाईप फिटींगचे काम करत होता. यावेळी मशिनच्या वरच्या बाजूला असलेली सैल माती पाईपवर आणि अर्जुनवर कोसळली. यामध्ये अर्जुनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तेथील कामगारांनी त्याला संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.