महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे ‘हॉटेल ड्राईव्ह इन’समोरील डायव्हर्जनजवळ मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार भाऊ आणि त्याची बहीण दोघेही जखमी झाले असून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी हार्दिक निशिकांत भोंडवलकर (वय २५, रा. शिवडी, मुंबई; मूळ रा. जुवे, रत्नागिरी) हे आपली दुचाकी (क्र. एम.एच. ०१ ई.एल. ५२५०) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे त्यांची बहीण मिताली विनायक सांगळे (रा. शिवडी, मुंबई) बसल्या होत्या. सकाळी ९ वाजेच्या सुमारास धामणी येथील डायव्हर्जनजवळ समोरून (गोवा बाजूकडून) येणाऱ्या मालट्रकने (क्र. एम.एच. ४३ ई. ३१२७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला उजव्या बाजूने जोरात धडक दिली.

​ट्रक चालक हरिभाऊ रघुनाथ गलगड्ढे (वय ५२, रा. आष्टी, जि. बीड) याने आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात घडला. या धडकेत हार्दिक भोंडवलकर आणि त्यांची बहीण मिताली सांगळे हे दोघेही जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

​याप्रकरणी ३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.