रत्नागिरी:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली. महामार्गावर चालत्या टँकरमधून होणारी गॅस गळती त्या टँकर चालकाला मागून येणाऱ्या वाहन चालकांनी सांगितल्यामुळे त्याने महामार्गावर टँकर थांबवला व काही वेळाने गॅस गळती थांबली अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती त्यामुळे महामार्गावरून धोकादायक स्थितीत होणाऱ्या एलपीजी वाहतुकीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान जयगडवरुन कर्नाटकच्या दिशेने जाणारा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर चरवेली, कापडगाव यादरम्यान आला असता त्याच्या गॅस टाकीच्या आतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढल्यामुळे आतील गॅस ओव्हरफ्लो होऊन टाकीच्या वरील भागात असणाऱ्या गॅसपाईप मधून अचानक बाहेर येऊ लागला यावेळी हा टँकर महामार्ग प्रवास करत होता त्यामुळे ही घटना गॅस टँकर चालकाच्या मागून येणाऱ्या काही वाहन चालकांनी थांबवून लक्षात आणून दिल्यावर त्याने टँकर रस्त्यालगत थांबवल्यावर जवळपास अर्ध्या तासाने आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गॅस बाहेर येणे बंद झाले. यावेळी परिसरात गॅसची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली होती परंतु या परिसरात मानवीवस्ती नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.
यानंतर घटनास्थळी संबंधित गॅस वाहतूक करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आल्यावर त्यांनी हा गॅस टँकरची टाकी आज असणाऱ्या उन्हाच्यामुळे आतील गॅसचे तापमान वाढल्यामुळे गॅस आपोआप ओव्हरफ्लो होऊन बाहेर आल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आता कोणताही धोका नसल्याचे सांगून टँकरवर थंड पाणी मारून आतील गॅसचे तापमान कमी होईल असे सांगून वाहतुकीसाठी मार्गस्थ होऊ शकतो असे सांगितले त्यानंतर टँकर मार्गस्थ करण्यात आला.
यावेळी घटनास्थळी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी तातडीने येऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना करत परिस्थिती हाताळली. याचबरोबर महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबा च्या पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली.
आजच्या कापडगाव गॅस टँकर ओव्हरफ्लो प्रकरणात ज्याप्रकारे चालत्या टँकर मधून गॅस बाहेर येत होता, त्यावेळी त्याच्या संपर्कात कोणतीही ज्वालाग्रही वस्तू आली नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तसेच या टँकरची गॅस वहन क्षमता 12 टन असताना त्याने त्या टाकीमध्ये जवळपास 11,760 टन इतका पूर्णपणे गॅस भरलेला असल्यामुळे प्रवासामध्ये हलून किंवा उष्णता अन्य बाबींमुळे त्याचे टाकीतील तापमान वाढून तो थेट ओव्हरफ्लो होऊन बाहेर आला. त्यामुळे अशा कंत्राटदार वाहतूक कंपनीच्या निष्काळजी पणामुळे गॅस वाहतूक करताना महामार्गावर मोठी जीवितहानीची दुर्घटना घडू शकते त्यामुळे याबाबतीत शासनाने कठोर निर्णय तातडीने घेऊन उपाययोजना करण्याची वेळ आली आहे.