रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावर पालीतील एका वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून विरुद्ध बाजूला जाऊन कलंडून झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
या अपघातासंदर्भात घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर पाली येथील शासकीय विश्राम गृहा नजीकच्या अवघड वळणावर सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणारा बल्कर ट्रक क्र. एमएच०८एच२६७७ हा चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन कलंडला. यामध्ये ट्रकच्या केबिनमध्ये चालक चंद्रभान कुमार रा. आजमगड राज्य उत्तरप्रदेश हा जखमी अवस्थेत अडकला होता. त्याला पालीतील ग्रामस्थ प्रशांत राऊत, अमेय वेल्हाळ, अमर कोलते यांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. महामार्गावरची या अपघातामुळे खोळंबलेली वाहतुक महामार्ग वाहतुक पोलीस मदतकेंद्र हातखंबाचे पोलीस कर्मचा-यांनी तात्काळ येऊन सुरळीत केली.









