रत्नागिरी:- राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कामातील दगड फोडण्यासाठी बोरवेल ब्लास्टिंगचा वापर होत आहे. ब्लास्टिगमुळे या परिसरातील अनेक घरांना तडे गेले आहेत. याबाबतची तक्रारी कुरधुंडा-मानसकोंड ग्रामस्थांनी केल्यानंतर याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी यांनी ब्लस्टिंग तात्काळ बंद करा अशा सूचना दिल्या आहेत.
कुरधुंडा गावातील राष्ट्रीय महामार्गावरील बोरवेल ब्लस्टिंगला ग्रामपंचायतीने विरोध करूनही ते बंद करण्यात आले नव्हते. एका वेळी 25 ते 30 पेक्षा जास्त होल अडीचशे फुटापेक्षा खोल मारून त्या ठिकाणी बोरवेल ब्लास्टिंग केले जात होते. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून गावातील अनेक घरांना तडेसुद्धा गेले आहेत. ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी या भागाची पाहणी केली. प्रत्यक्षात लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक झाली. या सभेला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेऊन ब्लास्टिंग बंद करा अशी सूचना दिल्या. ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांची नुकसान भरपाई द्या असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाबद्दल कुरधुंडा व मानसकोंड ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला कुरधुंडा ग्रामपंचायतीचे सरपंच सबा अलजी, उपसरपंच तैमुर अलजी, जमूरत अलजी, नाझिमां बांगी, रमजान गोलंदाज, उस्मान मालगुंडकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.