महापुरात उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येकाला जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाच टक्के दराने कर्ज 

रत्नागिरी:-महापुरात उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना संकटातून उभे करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांसह मोठ्या व्यापाऱ्यांना ५ टक्के दराने कर्ज तत्काळ देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. १ वर्षे हे कर्ज फेडायचे नाही. शासनाकडुन काही टक्के इंटरेस्ट, सबसीडी व्याज अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न आहे. तसा अध्यादेश झाल्यास २ टक्के दराने कर्ज पुरवठा होईल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही  ना. उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी महापूर आला होता. या महापुरात चिपळूण शहर तर उध्वस्त झाले. पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. चिपळूणसह, खेड, राजापूर, रत्नागिरी अन्य तालुक्यातील छोटे-मोठे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. वाताहत झालेल्या व्यापाऱ्यांना उभारी देण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते. ना.उदय सामंत यांच्या पुढाकाराने व्यापारी, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह जेष्ठ उद्योजक किरण सामंत आदींची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बॅंकेने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. जी पैशाची गरज लागणार आहे ती अल्पदराने कर्ज देवून भागविण्यास जिल्हा बँक तयार आहे. हे कर्ज परतफेड करताना कर्जदारांना एकवर्षाचा अधिस्थगत (मॉरीटोरीयम) मुदत देणार आहे. एक वर्ष त्यांना कर्जाचा हप्ता फेडायचा नाही. व्याज फक्त भरायचे आहे. त्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चिपळूण, खेड व इतर ठिकाणी गरजेप्रमाणे एक वेगळा पुरग्रस्थ कर्ज मंजूरी कक्ष उभा करणार आहे.

 त्या माध्यमातून पुरग्रस्थांना, व्यापार्‍यांना, उद्योजकांना, दुकानदार, शेतकर्‍यांना, पुरात वाहून गेलेल्या वाहनधारक अशांना वित्त पुरवठा करण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शासनाने त्यासाठी काही टक्के इंटरेस्ट सबसीडी व्याज अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवर चर्चाही झाली. चिपळूणात पूर ओसरल्याने मदत कार्य जोरात सुरू आहे. सहा ते आठ दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षाआहे, असे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.