रत्नागिरी:- शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामाफत निर्गमित शासन निर्णयानुसार महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे कामकाज अंतीम टप्प्यात आहे. या अनुषंगाने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरणासाठी तसेच प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी शासनामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
आधार प्रमाणीकरण न झाल्यास योजनेंर्गत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. शेतकर्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेच्या जवळच्या शाखेत किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन बँकेचे कार्यकारी संचालक आणि जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.









