कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ
रत्नागिरी:- कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शनिवार 13 जानेवारीपासून सुुरुवात होत असून याचे उद्घाटनाला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हा समारंभ होणार असून सात जिल्ह्यातील सुमारे 1300 स्पर्धक रत्नागिरीत दाखल झाले असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
कोकण विभागातील पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील तेराशे खेळाडू, अधिकारी हे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. सुमारे 63 क्रीडा प्रकारात स्पर्धा होणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अध्यक्षस्थानी खा. सुनील तटकरे, खा. विनायक राऊत, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, आ. राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, शेखर निकम यांच्यासह अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा होणार आहे.
शनिवारी 13 रोजी सकाळी 9.30 वा. हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्घाटनासह अॅथलॅटिक्स, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, खोखो, थ्रो बॉल, कॅरम, बुध्दीबल, रिंग टेनिस, कबड्डी स्पर्धा होणार आहेत. तर गोगटे जोगळेकर मैदानावर क्रिकेट व फुटबॉल स्पर्धा होणार आहेत. शासकीय जलतरण तलावावर जलतरण स्पर्धा होणार असून लॉन टेनिसच्या स्पर्धा गद्रे मरीन एक्स्पोर्ट कंपनीच्या मैदानावर होणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रम खातू नाट्य मंदिरमध्ये होणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी सांगितले. या स्पर्धेनिमित्ताने सातही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असून कोकण आयुक्तही रत्नागिरीत दाखल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.