रत्नागिरी:- तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी मी काही करेन पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची गरज नाही. काही लोकांना मी ५ वेळा निवडून आलोय याची जाणीव करून द्यावे अशी बोचरी टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने यांचे नाव न घेता केली.तेरत्नागिरी येथील श्री देव विठ्ठल मंदिर सुशोभिकरण भूमिपूजनकार्यक्रमात बोलत होते.
रत्नागिरी येथील श्री देव विठ्ठल मंदिर सुशोभिकरण भूमिपूजन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले. रत्नागिरीकरांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर परिसराचं सौंदर्य आणि धार्मिक पर्यटन या दोन्हींच्या विकासाला चालना देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.
महायुती सरकारच्या काळात रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
शिवसृष्टी, भारतरत्न शिल्प प्रकल्प, बहिरेबुवा व विश्वेश्वर मंदिर सुशोभिकरण, बौद्ध विहार, अंडरआर्म क्रिकेट स्टेडियम ते सेमीकंडक्टर प्रकल्प—या सर्व उपक्रमांमुळे रत्नागिरीचा नवा चेहरा घडत आहे.
हा कार्यक्रम केवळ एका मंदिराच्या सुशोभीकरणाचा नाही,
तर रत्नागिरीच्या अस्मितेचा आणि वारकरी परंपरेच्या जपणुकीचा उत्सव आहे.
रत्नागिरीच्या विकासाचा प्रत्येक टप्पा हा जनतेच्या आशीर्वादाने आणि सहभागाने पूर्ण होत आहे.
आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीला आधुनिकतेची जोड देत रत्नागिरीचा विकास करत राहू, असे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार बाळ माने यांचा खरपूस समाचार घेतला. नगर परिषदेच्या निवडणुका आल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या, पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की अनेकांमध्ये जे चांगल्या पद्धतीने चाललंय ते अडवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. काल काहींनी मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला की अटल बिहारी वाजपेयी देखील भारत रत्न होते. मी सर्वांच्या साक्षीने सांगतो भविष्यातील एक महिन्यामध्ये भारत देश रत्नागिरीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने रत्नागिरीत काय केलंय हे बघायला येईल.
ते पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधिंच्या जीवनामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात काहींच्या जीवनामध्ये ते आले नाहीत माझ्या जीवनामध्ये आले. भैरी मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल अथवा विशवेश्वर मंदिर असेल याचे सुशोभीकरण करण्याचे भाग्य माझ्या नशिबात आले. अशी टीका ना. उदय सामंत यांनी केली.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आ. मुन्नाशेठ सुर्वे, ट्रस्टचे अध्यक्ष आनंद (नानासाहेब) मराठे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, प्रमोद रेडीज, राहुल पंडित, बिपीन बंदरकर साळवी, विजय पेडणेकर, राजन फाळके, सुदेशजी मयेकर, शिल्पाताई सुर्वे, मानसीताई करमरकर, विजय खेडेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









