मद्य विक्री, प्राशन प्रकरणी शहरात तीन ठिकाणी कारवाई

रत्नागिरी:- शहरात मद्य विक्री व प्राशन करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी शहरातील विविध भागात कारवाई केली. तीन ठिकाणी केलेल्या या कारवाईत एकूण ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बिलाल युसुफ मजगावकर (४१, रा. गोळप मोहल्ला, रत्नागिरी), विनायक मधुकर सनगरे (५४, रा. मधला फगर वठार, रत्नागिरी) आणि एक महिला असे संशयित आहेत. या घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहा ते सात या वेळात शहरातील टेक्नीकल शाळा, मारुती मंदिर, बेलबाग या ठिकाणी निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मटका, जुगार, मद्य विक्री, प्राशन यावर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत संशयित मद्यविक्री व सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.