मद्य परवाना काढा नाहीतर थर्टीफर्स्ट टाळा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात थर्टीफर्स्ट साजरा करताना मद्यपान करण्यासाठी परवाना अत्यावश्यक करण्यात आला आहे. दारू पिण्याचा परवाना न घेता थर्टीफर्स्टला ढाब्यावर किंवा हॉटेलात दारू पिणाऱ्या आणि त्यांना दारू पुरवठा करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभाग कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.  

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर जोरदार गस्त ठेवली आहे.  जिल्ह्यात 4 पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये मंडणगड – दापोलीसाठी एक, चिपळूण – गुहागरसाठी एक, रत्नागिरी – संगमेश्वरसाठी एक आणि लांजा – राजापूरसाठी एक पथक कार्यरत आहे. सिंधुदुर्गमध्ये राज्यातून आणखी 4 पथके तैनात ठेवली आहेत. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारु, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर आमची करडी नजर राहणार आहे.

थर्टीफर्स्ट साजरा करताना ढाब्यावर किंवा हॉटेलात बसून दारू पिणाऱ्यांवरही आमचे लक्ष राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धोमकर यांनी सांगितले. ढाब्यावर दारू पिणाऱ्यांबरोबरच त्यांना दारू उपलब्ध करुन देणाऱ्या मालकांवरही आम्ही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणार आहोत. त्यामुळे परवान्याशिवाय दारु पिणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे धोमकर यांनी सांगितले.