रत्नागिरी:- नाणीज येथील बंदोबस्त आटपून रत्नागिरीत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाहनाने तब्बल आठ वाहनांना धडक दिल्याची घटना शहरानजीक कुवारबाव येथे घडली. संबंधित पोलिस कर्मचारी मद्यधुंद असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून याबाबत मंगळवार सायंकाळपर्यंत तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित पोलिस कर्मचारी नाणीज येथे बंदोबस्तासाठी तैनात होता. बंदोबस्त आटपून हा कर्मचारी रत्नागिरी येथे निघाला होता. रत्नागिरीच्या दिशेने येत असताना हातखंबा ते कुंवारबाव पर्यंत जवळपास आठ गाड्यांना या पोलीस कर्मचाऱ्याने धडक दिली. संबंधित पोलीस कर्मचारी हा निवृत्त सैनिक असून सध्या मुख्यालय येथे कार्यरत आहे. पोलीस कर्मचाऱ्याने धडक दिलेल्या बहुतांश गाड्या या बाहेरून आलेल्या पर्यटकांच्या असल्याचे बोलले जात असून यामुळेच तक्रार अथवा गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.









