रत्नागिरी:- येथील शासकीय मत्स्य व्यावसाय शाळेच्या दुरुस्तीबाबत अनास्था दाखवली जात असून ती जागा एका इंग्रजी शाळेसाठी देण्याचा घाट घातला जात आहे. येथील शाळा दुरुस्ती करुन घेतली नाही तर या विरोधात उग्र आंदोलन करु असा इशारा एका निवेदनाद्वारे येथील नागरिकांनी दिला आहे.
शाळा दुुरुस्तीसह त्या मागील वास्तव मांडण्यासाठीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. नासीर कासम होडेकर, रहिम दलाल, नौशाद अहमदसाहेब वाडकर, शेख अहमद महंमद हुश्ये, नजीर अहमद फणसोपकर यांच्या सहीचे निवेदन सादर केले आहे.
रत्नागिरीतील शासकिय मत्स्यव्यवसाय शाळेच्या नादुरुस्त इमारतीमध्ये वंचित, अल्पसंख्याक गरीब झोपडपट्टीवासीय मच्छिमारांची 60 मुले शिक्षण घेतात. या शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शासकिय निधि उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केला. त्याचा एक भाग म्हणून जिल्हा नियोजन मधून 2020 -21 आर्थिक वर्षात इमारत दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून शाळा इमारत दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करुन घेण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, मत्स्यव्यवसाय शाळा यांची संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये शाळा इमारतीची दुरुस्ती जिल्हा परिषदेेने करावी असे सहाय्यक मत्स्य व्यावसाय आयुक्तांनी सांगितले. तसेच सातबारा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याची तयारीही दर्शविली. मात्र नंतर जमिन हस्तांतरणाचा परवानगी मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे असल्याचे कळवले. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्याकडून शाळा दुरुस्तीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मत्स्य व्यवसाय शाळांचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झाले तरी शाळांचे पालकत्व मत्स्यव्यवसाय विभागाकडे आहे. त्यामुळे पुढील सर्व जबाबदारी मत्स्यव्यवसाय विभागाकडेच आहे. सध्या ही शाळा बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपालिका शाळा क्र. 17 ची पहाणी करण्यात आली. पटसंख्या लक्षात घेता तेथील दोन खोल्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा नाहीत. शाळेची 58 गुंठे जमिन क्षेत्रावर खाजगी विकासकांचा डोळा आहे. एक हायटेक इंग्रजी माध्यमांची शाळा या ठिकाणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच कारणासाठी शासकिय मत्स्यव्यवसास शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे. ही शाळा बंद करु नये असा पवित्रा सर्व पालकांनी घेतला असून प्रसंगी आंदोलन करु असा इशारा दिला आहे. शाळा दुरुस्तीचे काम मत्स्यव्यवसाय विभागाने त्वरीत हाती न घेतल्यास उग्र आंदोलन करावे लागेल असे निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहे.