रत्नागिरी:- मडगाव ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसेंदिवस कोकण रेल्वे मार्गावर प्रतिसाद वाढताना दिसत आहे. या गाडीच्या एक्झिक्युटीव्ह चेअर कारच्या आरक्षणालाही प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. 28 ऑगस्टपर्यंतच्या फेऱ्यांसाठी प्रतिक्षा यादीवरील प्रवाशांची संख्या अधिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधून मडगाव ते मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृष्टी प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. वंदे भारत एक्सप्रेसचे मुंबई ते मडगाव मार्गावरील एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे प्रवास भाडे 3360 रुपये तर चेअर कारचे तिकीट 1815 रुपये आहे. गाडी सुरू झाली तेव्हा वंदे भारत एक्सप्रेसला एक्झिक्यूटिव्ह चेअर कारच्या प्रवासासाठी ते 3360 रुपये मोजावे लागत असल्यामुळे काहींनी याची तुलना मुंबई ते गोवा या विमान प्रवासाशी केली होती. वंदे भारतचे प्रवास भाडे इतके असेल तर या गाडीने कोण प्रवास करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र प्रत्यक्षात या गाडीतील सुविधांचा विचार करता प्रवासी तसेच पर्यटकांनी या गाडीला तिकीटचा विचार न करता पसंती दिल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई ते मडगाव प्रवासासाठी एक्झिक्यूटिव्ह चेअर कार या सर्वाधिक तिकीट असलेल्या आसन श्रेणीसाठी आरक्षण फुल्ल झाल्यामुळे आय आर सी टी सी वर या गाडीसाठी 28 ऑगस्ट पर्यंतच्या फेऱ्यांसाठी प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू झाले आहे. मुंबई -मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या येत्या गणेशोत्सवात दोन्ही बाजूच्या फेऱ्यांसाठी कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विसर्जना आधी तसेच विसर्जनानंतर जवळपास दहा दिवसांचे आरक्षण आधीच फुल झाले आहे. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीने प्रवास करणारे प्रवासी हे तिकिटाचा विचार न करता गाडीचा वक्तशीरपणा तसेच गाडीतील सुविधांचा विचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच कारणामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही गाडी प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.









