मच्छीमारांना मॉन्सूनचे संकेत ; वादळी वातावरणही शक्य

निवटा, बारीक शिंगटी, जवळा आला किनारी

रत्नागिरी:- हलका वारा, समुद्रात जाणवत असलेली वादळापुर्वीची शांतता, किनार्‍यावर येणार दर्प तर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडणारे निवटा, जवळा आणि बारीक शिंगटी यासारखी मासळी यावरुन पुढील पाच ते सहा दिवसात मॉन्सून कोकणात दाखल होईल असे संकेत मच्छीमारांना मिळू लागले आहेत. हंगाम संपुष्टात आल्यामुळे नौका सुरक्षित ठिकाणी ओढण्यास सुरुवात झाली आहे.

यंदा सर्वांनाच मॉन्सून पुर्व पावसाची प्रतीक्षाच आहे. केरळला येत्या दोन दिवसा मोसमी पावसाचे आगमन होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्राकार वार्‍यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील आठवडा कडाक्याच्या उन्हाचा गेला. शनिवारी (ता. 3) मध्यरात्री अचानक आभाळ भरून आले आणि रत्नागिरी शहरासह परिसरात पावसाचा शिडकावा झाला. पंधरा मिनिटे पडलेल्या पावसाने रस्ते ओले झाले होते. जिल्हापरिषदेजवळ एक दुचाकी चालक पावसाच्या पाण्यावरुन घसरून पडला. सुदैवाने दुखापत झाली नाही. रविवारी (ता. 4) सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत काही काळ ढगाळ वातावरण होते. पुन्हा उन्हाची तीव्रता जाणवू लागली. दुपारनंतर हलके वारे वाहू लागले होते. त्यामुळे पावसासह वादळी वातावरणाचे संकेत मिळू लागले. मॉन्सूनसंदर्भात कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी पारंपरिक अंदाजानुसार ठोकताळे मांडण्यास सुरुवात केली आहे. सध्या समुद्र शांत आहे, ही वादळापुर्वीची शांतता आहे असा एक अंदाज व्यक्त केला आहे.

वादळाची शक्यता असेल तर त्यापुर्वी मोठ्या लाटा येत नाहीत. उनही अंगाला झोंबल्यासारखे असते. किनारी भागात चॉकलेटी रंगाचा बुडबुड्यांचा विशिष्ट प्रकारचा फेस दिसू लागला आहे. तसेच किनारी भागात वेगळा दर्प (घाणीसारख वास) येऊ लागला आहे. याला समुद्र उलटी करतो असे जुने मच्छीमार म्हणतात. पाऊस येण्यापुर्वीचे हे संकेत आहेत. उत्तरेतून येणारे वारे थांबतात आणि दक्षिणेकडून वारे वाहण्यास सुरवात होते. त्याला सवाल जवाब म्हटले जाते. तसेच निवटा, बारीक शिंगटी, जवळा यासारखी मासळी किनारी भागात आढळू लागल्याने पाऊस पाच ते सहा दिवसात दाखल होईल मच्छीमारांचे मत आहे. ही मासळी चिखलात राहते. समुद्रात बदल होऊ लागले की ते मासे पृष्टभागावर येऊ लागतात. यावरुन समुद्रात काहीतरी बदल होत आहेत, हे समजते.