रत्नागिरी:- मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या समुद्री कासवांना जीवदान देताना जाळ्यांचे नुकसान झालेल्या मच्छीमारांना कांदळवन कक्षामार्फत मदत दिली होते. यंदाच्या वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ कासवांना मच्छीमारांनी जीवनदान दिले आहे. त्या मच्छीमारांना नुकसानपोटी सुमारे एक लाखाची मदत वितरीत करण्यात आली आहे.
मच्छीमारांच्या जाळ्यात सापडून कासव, डॉल्फीन व अन्य संरक्षित जातींचा मृत्यू होतो. गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे ग्रीन सी टर्टल, हॉकबील सी टर्टल, ऑलीव्ह रिडले टर्टल या कासवांची संख्या कमी होत आहे. त्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलण्यात आली आहेत. भारतामध्येही या कासवांना संरक्षित दर्जा देण्यात आलेला आहे. परंतु अनेकवेळा मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये ही कासवे अडकतात. जाळ्यात अडकलेल्या कासवांना सोडवताना, जाळ्यांचे नुकसान होते. त्यामुळे मच्छीमारही अनेकदा जाळ्यातून बाहेर काढण्याकडे दुर्लक्ष करतात. मच्छीमारांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम वनविभाग व कांदळवन कक्षामार्फत सुरु आहे. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जाळ्यात सापडलेल्या संरक्षित प्राण्यांना नुकसान सोसूनही मच्छीमार जीवदान देताना दिसत आहेत. मागील वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात ६ तर सिंधुदुर्गमध्ये २ घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मच्छीमारांनी ४ ग्रीन सी टर्टल, एक हॉटबील सी टर्टल व १ ऑलीव्ह रिडले सी टर्टल कासवांना जीवदान दिले आहे. सिंधुदुर्गमध्ये एक हॉकबील सी टर्टल तर एक ऑलीव्ह रिडले सी टर्टलला मच्छीमारांनी जीवदान दिले आहे. यावेळी मच्छीमारांच्या जाळ्यांचे थोड्याफारप्रमाणात नुकसानही झाले. या नुकसानभरपाई पोटी अनुदान देण्यात आले. आठ प्रकरणांमध्ये एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील सहा प्रकरणांमध्ये ७५ हजार तर सिंधुदुर्गतील दोन प्रकरणांमध्ये २५ हजार अशी प्रत्येकी साडेबारा हजार रुपयांची मदत वनविभागामाफत मच्छीमारांना करण्यात आली.
संरक्षित असलेल्या समुद्री कासव किंवा अन्य प्राण्यांना जीवदान देताना जाळ्यांचे नुकसान झाल्यावर याबाबत मत्स व्यवसाय खात्याकडे अर्ज दाखल करण्यात येतो. तेथून तो अर्ज वनविभागाकडे पाठवला जातो. या विषयाची दोन्ही विभागाकडून खात्री करुन वनविभागाकडून संबंधित मच्छीमारांना थेट मदतीचा निधी दिला जातो. मच्छीमारांमध्ये संरक्षित सागरी प्राण्यांबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी वनविभागाकडून हा उपक्रम राबवला जात आहे.