…मग त्या अपघातांची, नादुरुस्त वाहनांची देखील जबाबदारी घ्या: मिलिंद किर

रत्नागिरी:- रत्नागिरीतील रस्ते लवकरच गुळगुळीत होतील, असे शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी सांगितले. या गुळगुळीत रस्त्यांचे श्रेय शिवसेना घेणार असताना मग रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जे अपघात झाले, वाहने नादुरूस्त झाली, रत्नागिरीकरांना जो त्रास झाला त्याची जबाबदारीसुद्धा सत्ताधारी शिवसेनेने घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मन:स्ताप गेल्या चार वर्षांपासून रत्नागिरीकरांनी सोसला आहे. खड्डे भरण्यासाठी 50 लाख रूपये खर्च करण्यात आले. हे भरलेले खड्डेसुद्धा जास्त काळ टिकले नाहीत. अपघात व्हायचे ते होत राहिले. मन:स्ताप आणि त्रास व्हायचा तो होतच आहे. जनतेच्या तिजोरीतील खर्च झालेले हे पैसे योग्यवेळी रस्त्याचे काम झाले असते तर वाया गेले नसते. रत्नागिरी नगर परिषदेला झालेला या भुर्दंड प्रकरणी दाद मागणार असल्याचेही कीर यांनी यावेळी सांगितले.

खड्ड्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या वतीने माझ्यासह ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, शहर अध्यक्ष निलेश भोसले, युवा नेते बंटी वणजू यांनी जनतेची बाजू मांडली. आमच्या या विरोधाचा सत्ताधारी शिवसेनेने दखल घेतली. यातच आमचा विजय आहे. जो काही त्रास होतोय तो संयमाने घेतला. परंतु, सत्ताधारी शिवसेनेने सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही दिला. रस्ता डांबरीकरणाची कामे करणार असल्याचे सांगून आता श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु, जे काही हाल आणि नुकसान सोसावे लागले त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही उपस्थित केला.