ऐन नवरात्रोत्सवात भरणे-फागेवाडीवर दुःखाचा डोंगर
खेड:- तालुक्यातील भरणे येथील श्री देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी चढलेल्या रमेश बाळा फागे (वय ४२, भरणे – फागेवाडी, ता. खेड ) या तरुणाचा तोल गेल्याने तो खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.
भरणेतील श्रीदेवी काळकाईचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे मंदिराच्या स्वच्छतेचे काम ग्रामस्थांकडून हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या स्वच्छतेसाठी वाडीनिहाय पाळ्या लावण्यात आल्या आहेत. रविवारी भरणे फागेवाडी व जाधववाडी येथील ग्रामस्थांची स्वच्छतेची पाळी होती.
मंदिराच्या कळसावर चढलेल्या तरुणांकडून स्वच्छतेचे काम सुरू होते. यातील रमेश फागे हा तरुण स्वच्छता करत असताना अचानक आधार म्हणून धरलेल्या भागावरुन त्याचा हात निसटला आणि तो खाली पडला. त्याला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.