मंत्र्यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणल्याची बाब खासदारांना कोणत्या माहितीच्या अधिकारात मिळाली: ना. सामंत

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील खाजगी जागेच्या घोटाळ्याबाबत खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबधीत प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. तर तत्कालीन मंत्र्यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणल्याची गोष्ट खासदारांना कोणत्या माहितीच्या अधिकारात मिळाली असा टोला पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी खा.विनायक राऊत यांना लगावला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील वनजमीन घोटाळ्याबाबत आपण योग्य चौकशी करण्याची सूचना जिल्हाधिकारी व पोलिसांना दिली आहे. यात कोणी दोषी असतील तर त्यांच्या कारवाई निश्चित केली जाईल. मात्र इतक्या वर्षानंतर याबाबत मंत्र्यांनी अधिकार्यांवर दबाव आणल्याची माहिती इतक्या उशिरा खासदारांना कशी मिळाली हा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
बारसू रिफायनरीबाबत माती परीक्षण अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनीने त्याला हिरवा कंदिल दिल्यावर आवश्यक पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले. चीनमध्ये आरमको कंपनीने काही प्रकल्प करीत असतील तरी येथील प्रकल्प होणार नाही असे काही सांगितलेले नाही. त्यामुळे जमिनीच्या अहवालानंतर पुढील निर्णय होतील असेही ना.सामंत यांनी स्पष्ट केले.
नाईट लॅंण्डींगबाबत विमान प्राधिकरण व तटरक्षक दलामध्ये पत्र व्यवहार सुरु असून, हे कामही लवकरच होणार आहे. त्यामुळे नाईट लॅंण्डींगसाठी लवकरच काम सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळावर ८० सीटर विमान उतरेल यादृष्टीने धावपट्टीचे काम झाले असल्याचेही ना.सामंत यांनी सांगितले.