सिंधुदुर्गातील पिकअप चालकावर गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव स्टॉपजवळ शुक्रवारी (२१ जून २०२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जयश्री तुकाराम खेडेकर (वय ६५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. भरधाव वेगात आलेल्या बोलेरो पिकअपने दुचाकीला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात बोलेरो पिकआप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड, रायगड येथील कोंडमालुसरे येथील रहिवासी तुकाराम सीताराम खेडेकर (वय ६९) हे आपली पत्नी जयश्री तुकाराम खेडेकर (वय ६५) यांच्यासोबत मोटारसायकल ( एम.एच. ०४ जे.टी. ००५८) वरून मंडणगड तालुक्यातील पाट येथील मेहुणीच्या कार्यासाठी आले होते. विधी आटोपून ते पाट येथून शिरगावकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याने शिरगाव मेन रोडवर आले.
त्याच वेळी, मंडणगड ते म्हाप्रळच्या दिशेने जाणाऱ्या( एम.एच. ०७ ए.जे. ३४१७) या बोलेरो पिकअपवरील चालक सौरभ संदीप चौगुले (वय १८, रा. मालवण, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याने खेडेकर यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात जयश्री तुकाराम खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात फिर्यादी तुकाराम खेडेकर यांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तुकाराम सीताराम खेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ जून २०२५ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.