मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वे ठप्प

दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत; वाहतुकीवर परिणाम 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर रविवारी (ता. १२) खेड तालुक्यातील कळंबणी ते दिवाणखवटी या स्थानका दरम्यान नवी दिल्लीकडे जाणार्‍या मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सुमारे दोन तासानंतर दुसरे इंजिन जोडून मंगला एक्सप्रेस मार्गस्थ झाली. तोपर्यंत सकाळच्या सत्रातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

मडगावहून नवीदिल्लीकडे जाणार्‍या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कळंबणी ते दिवाणखवटी दरम्यान थांबून होती. हा प्रकार समजल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही गाड्या आजूबाजूच्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यात मुंबई सीएसएमटी ते मडगाव या दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस व दिवा ते सावंतवाडी जाणारी सिंधुदुर्ग एक्सप्रेस या दोन्ही गाड्या करंजाडी स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. शनिवार, रविवारी जोडून सुट्ट्या आल्यामुळे चाकरमानी मुंबईच्या दिशेने चालले होते. मुंबईहून कोकणात येणार्‍या आणि कोकणातून मुंबईत जाणार्‍या दोन्ही बाजूकडील गाड्यांना प्रवाशांची गर्दी होती. गाड्या उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी झालेली होती. मंगला एक्स्प्रेससह अन्य काही गाड्या उशिराने धावत होत्या. खेडवरुन दुसरे इंजिन जोडून १२.३७ वाजण्याच्या सुमारास मंगला एक्सप्रेस मार्गस्थ झाली. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.