भोस्ते घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड:- मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर ट्रकच्या धडकेने तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१६) सायंकाळी ५ वाजण्याच्या समारास घडली. शुभम सदाम काणेकर (२६, रा. मोरवंडे, सुतारवाडी, ता. खेड) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

शुभम दुचाकीने मोरखंडे येथे जात असताना, भोस्ते घाटाच्या अवघड वळणावर पुढे असलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ भरणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

मोरवंडेचे ग्रामस्थ सुदाम काणेकर यांचा द्वितीय पुत्र शुभमने अतिशय कमी कालावधीत आपल्या इंटेरियर डिझाइनच्या कामामुळे तालुक्यात जम बसविला होता. जिद्दी, मेहनती तरुण म्हणून तो ओळखला जात असे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तो रात्रंदिवस झटत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमळे गावावर शोककळा पसरली आहे.