खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या भोस्ते घाटातील वळणावर एका भरधाव ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट संरक्षक भिंतीला जाऊन धडकल्याने या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून, वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दिनांक ३१ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फिर्यादी पांडुरंग राजाराम जाधव (वय २८, रा. मांडवा, जि. बीड) हे ट्रक (क्र. MH-46-BB-5871) वर क्लिनर म्हणून काम करत होते. आरोपी चालक शहादेव नानाभाऊ साबळे (वय ३५, रा. बावी, जि. बीड) हा ट्रक चालवत होता. भोस्ते घाटातील तीव्र उतारावर आणि वळणावर ट्रक आला असता, चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अत्यंत वेगात आणि हयगयीने चालवले. त्यामुळे वळण घेताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याशेजारील संरक्षक भिंतीला जोरात धडकला.
या भीषण धडकेत ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालक शहादेव साबळे याला किरकोळ दुखापत झाली असली, तरी क्लिनर पांडुरंग जाधव यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी क्लिनर पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालक शहादेव साबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









