रत्नागिरी:- मागील 15 वर्ष पडक्या वास्तूत वास्तव्य करणाऱ्या 74 वर्षीय आजोबांना हक्कच घर मिळणार आहे. त्यांच्या मदतीला धावले ते किरण उर्फ भैया सामंत यांचे दोन खंदे शिलेदार. दोघांनी मिळून भैया यांच्या वाढदिवसानिमित्त या वृध्दाला घर बांधून देण्याचा चंग बांधला आहे. भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त 74 वर्षीय आजोबांच्या चेहऱ्यावर घर मिळाल्याचा वेगळाच आनंद होता.
रत्नागिरी तालुक्यातील वाटद- मिरवणे येथील वरची बाचरेवाडी येथे 74 वर्षीय कृष्णा कुशा बाचरे हे वास्तव्याला आहे. गेली पंधरा वर्ष ते एकाकी जीवन जगत आहेत. मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. घराची अवस्था एवढी बिकट आहे की ते कधी पडेल हे सांगता येत नाही. घराच्या फक्त दोनच भिंती उरल्या असून एका बाजूने पत्रे लावले आहेत. वासे व कौले एका बाजूला पडण्याच्या स्थितीत असून त्याठिकाणी लाकडाचे टेकू दिलेले आहेत. घरातील चूलही पडलेल्या भागात असून त्याही परिस्थितीत ही वृध्द व्यक्ती जगण्याची धडपड करीत आहे.
या वृध्द व्यक्तीच्या घराची स्थिती शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांच्या कानावर आली. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचे खंदे समर्थक अजिम चिकटे व अरूण झोरे यांनी पुढाकार घेत या वृध्दाला स्वत:चे छोटेसे घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेतला. भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त या कृष्णा बाचरे यांना घर बांधून देऊन त्यांचे पुढील जीवन थोडे सुखकर करण्याचा प्रयत्न दोघांनी सुरू केला. घर बांधण्यासाठी लागणारे जांभे चिरे दाखल झाले असून गवंडीकाम व सुतारकाम करणार्यांनाही घराचे काम लवकर करण्याची विनंती केली आहे.
उद्योजक भैया सामंत यांच्या आशीर्वादाने अजिम चिकटे व अरूण झोरे यांनी कृष्णा बाचरे यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे पाऊल टाकले आहे. बाचरे यांनी याबद्दल भैया सामंत यांना अनेक शुभ आशीर्वाद देतानाच सामंत यांच्या हस्तेच घराचे उद्घाटन व्हावे, अशा भावना चिकटे व झोरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. भैया सामंत यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याने ते लवकरात लवकर घरी परतावेत म्हणून त्यांनी प्रार्थनाही केली.