भूमिगत वीज वाहिन्यांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 260 कोटी

रत्नागिरी:-  वादळी वारे, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत वीजप्रवाहाची अखंडित सुविधा देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या भूमिगत वीज वाहिन्यांच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 260 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात 90 टक्के कामे आटोपली असून दुसरा टप्पाही आता वेगात राबण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस असो वा चक्रीवादळ याचा फटका महावितरणला बसतो. वीजपुरवठा खंडित तर होतोच शिवाय कोलमडलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेळ, पैसा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प दोन अंतर्गत जिल्ह्यातील किनारपट्टी लगत 200 मीटर अंतरावरील गावातून भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. भूमिगत वीज वाहिन्यांमुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. फयान, तोक्ते, निसर्ग या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला होता. त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प एकच्या यशस्वी पूर्ततेनंतर आता प्रकल्प दोन टप्प्यांत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाच्या कामाची 90 टक्के पूर्तता झाली आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी 260 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे वादळी वारे, पाऊस यामुळे उद्भवणार्‍या समस्यांना यापुढे विराम मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यात रत्नागिरी शहर व आसपासच्या गावातील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले होते. यातील 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यात किनारपट्टीलगतच्या गावांची निवड करण्यात आली आहे. एकूण 260 कोटीचा हा प्रकल्प असून मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, वादळ याचा परिणाम वीजयंत्रणेवर होणार नाही. ग्राहकांना अखंडित वीजेसह महावितरणचे आर्थिक नुकसानही वाचणार आहे.

रत्नागिरी विभागात 1746.08, चिपळूण विभागात 1543.1, तर खेड विभागात 1146 किलोमीटर अशा 4,435.18 किलोमीटरपर्यंत भूमिगत वीज वाहिन्या बसविण्यात येणार आहेत. तसेच, 223 नवीन रोहित्र व 21,488 विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. सध्या हे कामही वेगात काम सुरू आहे.