९४ कोटीचा सायक्लॉन प्रकल्प ; सुमारे २४८ किमीचे जाळे
रत्नागिरी:- चक्रीवादळांपासून समुद्रकिनारी भागातील वीजपुरवठ्याला सुरक्षा देण्यासाठी महावितरणच्या ‘सायक्लॉन’ (वादळ) योजनेचे रखडलेले काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. उच्चदाब, लघुदाब वाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत. त्यामुळे वादळात अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहणार आहे. सुमारे ९४ कोटींचा हा प्रकल्प असून तालुक्यातील किनारी भागातील २४ गावातून ही योजना जाणार आहे.
योजनेतील ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचे ५६ टक्के, ११ केव्हीचे काम ८४ टक्के तर लघुदाब वाहिनीचे २५ ट्क्के काम पूर्ण झाले आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या आहेत.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) त्याची तांत्रिक पाहणी केली आहे. महावितरण कंपनीने यापूर्वी देखील याबाबतचा प्रस्ताव दिला होता; मात्र तो रद्द झाल्यामुळे नव्याने हा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो केंद्राला सादर केल्यानंतर आणि किनाऱ्यावर वारंवार चक्रीवादळ येत असल्याने केंद्र शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली. गेल्या वर्षीपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. बहुतांशी सागरी किनार्यालगतचा भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पाऊस व वादळामुळे तसेच जोरदार वार्याने किनारी भागात झाडाच्या फांद्या पडून, झाडे उन्मळून किंवा विद्युतखांब कोसळल्यामुळे वीजवाहिन्या तुटून विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेकवेळा काही तांत्रिक दोष निर्माण झाला की, फिडरवरील सर्व विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो. शहर परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. त्यावर उपाय म्हणून रहाटाघर येथे आणखी एक विद्युत उपकेंद्र सुरू करण्यात आले.
पाच टप्प्यांमध्ये भगवती, मिरकरवाडा, मांडवी, मिर्याबंदतर, रामआळी, तेलीआळी, आठवडाबाजार, रहाटाघर, पांढरा समुद्र, सडामिर्या, जेलरोड, मच्छीमार्केट, धनजीनाका, राजिवडा, शिरगाव, तिवंडेवाडी, मुस्लिम मोहल्लापासून आडीफाट्यापर्यंत, कोकण नगर, आझादनगर, मारूती मंदिर ते साळवी स्टॉप आणि एमआयडीसी ते मिरजोळे, साळवी स्टॉप ते कुवारबाव यांचा समावेश आहे.