‘भिक मांगो’ आंदोलन, ‘मूक मोर्चा’नंतर चिपळूण बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

चिपळूण:- वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढा आणि पुररेषा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी दिनांक 6 डिसेंबर रोजी प्रांत कार्यालयासमोर चिपळूण बचाव समितीने सुरू केलेल्या साखळी उपोषणाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. बुधवारी पुकारलेल्या चिपळूण बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला तर आजूबाजूच्या देखील बाजारपेठाही बंद होत्या. या बंदमध्ये छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी सहभाग घेऊन चिपळूण वाचवण्यासाठी एकजुटीचे दर्शन घडवले आहे.

दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूण शहरासह आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेत दिनांक 6 डिसेंबरपासून येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची पहिल्या टप्प्यात शासनाने दखल घेतली. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यामुळे चिपळूण बचाव समितीने साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. तर उपोषणाची धार तीव्र करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ‘भिक मांगो’ आंदोलन नंतर ‘मूक मोर्चा’ काढून आपला इरादा स्पष्ट केला. तर या उपोषणाची धार अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने बुधवारी चिपळूण बंदची हाक दिली. या हाकेला चिपळूणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत छोट्या मोठ्या व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंद 100 टक्के यशस्वी करून दाखवला.