गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल
रत्नागिरी:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. याच संदर्भात भाजपचे नेते आणि गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी जातीपातीचे राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातू यांनी केला आहे.
डॉ. विनय नातू म्हणाले की, “भास्कर जाधव यांना आता काही लोक सोडून गेले आहेत आणि त्या सभेतून हे सर्व सुरू झाले आहे. एक विशिष्ट समाज आपल्या मागे राहील असे बघून त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अनेक वर्षांपासून हा विषय सुरू आहे, कुणाचा राग कुणावर तरी काढायचा असं सुरू आहे. जातीच्या आधारावर लोकांना घाबरवण्याचे काम सुरू झाले असून, केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत आहे. लोक त्यांना का सोडून जात आहेत, याकडे त्यांचे लक्ष नाही.” नातू यांनी सांगितले की, “एका राजकीय सभेत खोत, ब्राह्मण असे बोलून त्यांनी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला आहे.”
नियोजन निधी वाटपावर टिप्पणी
नियोजन निधी वाटपाच्या वादावर बोलताना डॉ. नातू म्हणाले की, “निधी वाटपाच्या वादावर मी कुणाचे नाव घेतले नाही.”
आगामी निवडणुका आणि युती
आगामी निवडणुकांबद्दल बोलताना डॉ. नातू यांनी जागावाटपावर भाष्य केले. “सन्मानजनक जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्यावर मी बोलेन,” असे ते म्हणाले. “नाहीतर सर्वांना सर्व पर्याय उपलब्ध आहेत.” कोकणातील अनुशेष युती सरकारने दूर केला होता आणि आता महायुती सरकारनेही तेच करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सारस्वत ब्राह्मण यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया
गोगावले, शिंदे आणि सामंत यांच्या उपस्थितीत सारस्वत ब्राह्मण समाजाने केलेल्या पक्षप्रवेशावर डॉ. नातू म्हणाले की, “सारस्वतांनी पक्षप्रवेश करून भास्कर जाधव यांची दुखरी नस दाबल्याचे दिसत आहे.” मात्र, आता कोकणस्थ ब्राह्मण यांना याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत, असेही ते म्हणाले.
या राजकीय घडामोडींमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण अधिकच रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.









