भाताच्या गरव्या बियाण्यांना शेतकर्‍यांकडून मागणी

पावसाचा कालावधी लांबला; कोरोनानंतरचे भातक्षेत्र वाढलेलेच

रत्नागिरी:- हवामानातील बदलांमुळे मागील तिन वर्षात ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामातील भातशेतीवर परिणाम होत आहे. याला पर्याय म्हणून शेतकर्‍यांकडून गरवी (135 दिवसानंतर उगवणारी) बियाण्यांची खरेदी वाढली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भातक्षेत्र वाढले असुन उत्पन्न मिळवण्याच्यादृष्टीनेही शेतकरी वर्ग विचार करु लागला आहे.

ग्लोबल वॉमिर्ंगमुळे हवामान बदल होत असून मागील तिन वर्षात मॉन्सून परतल्यानंतरही ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरुच राहते. या बदलाचा फटका कोकणातील भातशेतीला बसत आहे. दोन वर्षांपुर्वी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कापलेले भात वाहून गेले होते. हजारो हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद आहे. हळवी बियाणे लवकर होत असल्यामुळे अवकाळी पाऊस त्याला मारक ठरत आहे. यावर्षी अनेक शेतकर्‍यांकडून गरवी म्हणजेच उशिराने होणार्‍या बियाण्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हळवी (120 दिवसांचे), निम गरवी (120 ते 135 दिवस) आणि गरवी (135 दिवसांपेक्षा अधिक) बियाणे पेरली जातात. हळवी आणि निम गरवीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून गरवी बियाणी शेतकरी विकत घेत आहे. शिरगाव येथील भात संशोधन केंद्रातून यंदा बर्‍यापैकी गरवी बियाणे खरेदी करण्यात आली आहेत. काहींनी पावसाचा कल पाहून बियाणेही बदल करुन घेतली. 50 टन बियाण्यांपैकी चाळीस टक्केहून अधिक गरवी बियाणे विक्रीला गेली. त्यात रत्नागिरी 8, कर्जत 2 आणि सुवर्णा यांचा समावेश आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात दरवर्षी 67 हजार हेक्टरवर भात लागवड होते. कोरोनामुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतले, हाताला काम नसल्यामुळे त्यांनी पडीक शेतजमीन कसण्याचा पर्याय स्विकारला. त्यामुळे मागील दोन वर्षात भात क्षेत्राखालील तीन हजार हेक्टर क्षेत्रात वाढ झाली. गतवर्षी 70 हजार हेक्टरवर भाताची लागवड झाली होती. यंदाही त्याच पध्दतीने लागवड होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानुसार खरीप हंगामाचे जिल्हा प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. शिरगाव भात संशोधन केंद्र, कोकण कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी शिफारस केलेल्या भातबियाण्यांची विक्री केली जाते. यंदा सुमारे अडीचशेहून अधिक टन बियाणे विक्री केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा भातशेतीकडील कल अजुनही कायम राहीला आहे.