भाडेवाढ एसटीच्या पथ्यावर; तीन महिन्यात दीड कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी:- आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी विभागाला भाडेवाढीचा फायदा झाला असून, एसटीच्या उत्पन्नात दरदिवशी सुमारे दीड ते दोन लाखांची भर पडत आहे.गेल्या तीन महिन्यामध्ये रत्नागिरी एसटी आगाराला सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे; परंतु अनेक वर्षांपासून एसटी महामंडळाचे चाक आर्थिक खोलात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न महामंडळाने केले; परंतु त्यांना फारसे यश आले नाही. त्यापैकी कार्गो सेवेने काहीसे एसटीला तारले; परंतु डिझेल, चेसिस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ केली. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. प्रवाशांमधून संताप व्यक्त झाला. काही संघटना, पक्षांनी भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलनेही केली होती; मात्र त्याला न जुमानता भाडेवाढ कायम ठेवली. एसटी बसेसच्या तिकिटात १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे; परंतु त्याचा एसटीच्या भारमानावर फारसा फरक पडलेला दिसला नाही. एसटीच्या सेवेमध्ये दिवसेंदिवस चांगला बदल होताना दिसत असल्यामुळे आणि योजनांचा फायदा होत असल्याने भारमान कायम आहे.

भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९ डेपो मिळून आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला ९ लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता त्यात वाढ होऊन तब्बल ११ लाख झाले आहे. भाडेवाढ केल्यामुळे दररोज दीड ते २ लाखांचे उत्पन्न वाढले आहे. जवळ अंतरावरील प्रवास केल्यास १० ते २५ रुपयांचा तर लांब पल्ल्याच्या गाडीत प्रवास केल्यास तब्बल ५० ते १५० रुपयापर्यंत भाडेवाढ झाली आहे. एकंदरीत, भाडेवाढ केल्यामुळे एसटीची मालामाल झाली आहे; परंतु प्रवाशांची ओरड सुरूच असल्याचे चित्र आहे.