रत्नागिरी:- सुट्ट्यांच्या आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात ओढवलेला जीवघेणा प्रसंग स्थानिकांच्या तत्परतेमुळे टळला आहे. समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागलेल्या सोलापूर येथील एका तरुणीसह तरुणाला भाट्ये गावातील सतर्क तरुणांनी ‘कृष्णा’ स्पीड बोटच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजा तमन्ना मेत्रे (वय २३) आणि ऋषिकेश राजशेखर कोळी (वय २३, दोघेही रा. रविवार पेठ, शेळगी, जिल्हा सोलापूर) हे पर्यटक आज रत्नागिरीतील प्रसिद्ध भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास हे दोघेही समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले.
जवळपास दीड तास समुद्रात पोहल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दमछाक झाल्याने ते खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जिवाच्या आकांताने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक तरुणांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.
बुडणाऱ्या पर्यटकांना पाहताच भाट्ये गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात धाव घेतली. किरण अशोक भाटकर यांनी आपली ‘कृष्णा स्पीड बोट’ तातडीने पाण्यात उतरवली. त्यांच्यासोबत गावातील पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर आणि महेश नथुराम पिलणकर यांनी बोटीतून घटनास्थळी धाव घेतली.
अत्यंत चपळाईने या जीवरक्षकांनी बुडणाऱ्या तेजा आणि ऋषिकेश या दोघांनाही बोटीत खेचून घेतले आणि त्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. या तरुणांच्या धाडसामुळे आणि समयसुचकतेमुळे सोलापूरच्या या दोन्ही पर्यटकांचे प्राण वाचले आहेत. सध्या दोन्ही पर्यटक सुखरूप असून त्यांनी स्थानिक तरुणांचे आभार मानले आहेत.
किरण अशोक भाटकर (मालक, कृष्णा स्पीड बोट), पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर ५. महेश नथुराम पिलणकर (सर्व राहणारः भाट्ये, रत्नागिरी)
रत्नागिरीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. मात्र, अनेकदा उत्साहाच्या भरात पर्यटक खोल पाण्यात जातात किंवा भरती-ओहोटीच्या वेळांचे भान न ठेवल्याने अशा दुर्घटना घडतात. प्रशासनाकडून आणि स्थानिक ग्रामस्थांकडून पर्यटकांना नेहमीच सतर्कतेचे आवाहन केले जाते. आज भाट्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.









