भाट्ये येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये दर्गा स्टॉप येथे झालेल्या कार- दुचाकीमधील अपघातांत दुचाकीस्वार तरूण जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. या अपघातात दुचाकी चालक केतन शशिकांत साळवी (३६, रा. फणसोप टाकळेवाडी, रत्नागिरी) जखमी झाला. केतन याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन हा १५ मे रोजी आपल्या ताब्यातील ॲक्सेस दुचाकी (एमएच- ०८-एव्ही-७८७७) घेऊन रत्नागिरीत ते फणसोप असा आपल्या घरी जात होता. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राहुल अण्णासाहेब पतनकुट्टे (२५, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) हा ऑल्टो कार (एमएच- ०८-सी-५४२५) घेऊन पावस ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने भाट्ये दर्गा स्टॉप येथे घेऊन आली असता राहुलचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या केतन साळवीच्या दुचाकीला समोरुन धडक बसली.

ही धडक इतकी जोराची होती की त्यात दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा होऊन ऑल्टो कार रस्त्याच्या २५ ते ३० फूट खाली जाउन तेथील झाडीत अडकून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच या अपघातात केतनच्या डोक्याला, दोन्ही हातांना, पायांना गंभीर दुखापत होउन त्याच्या दोन्ही कानातूनही रक्त येत होते.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी अपघाताचा पंचनामा करुन स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी केतनला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.