रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस जाणार्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे जााणार्या फाट्यासमोर भरधाव बुलेट दुचाकीची समोरुन येणार्या अॅक्टिव्हा दुचाकीला धडक बसून अपघात झाला. अपघाताची ही घटना बुधवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12.45 वा.सुमारास घडली.
या अपघातात बुलेट चालक राजेश दिनकर किर (41,रा.रनपार,रत्नागिरी) आपल्या ताब्यातील बुलेट (एमएच-08- एडब्ल्यू-4050) वरुन सोबत मिलिंद कृष्णा महाडिक (47,रा.फणसोप,रत्नागिरी) यांना घेउन रत्नागिरी ते पावस असा जात होता. त्याच सुमारास मानसी राजेंद्र पवार ही तरुणी आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच- 08-एझेड- 1824) वर पाठीमागे तिची बहिण ॠद्राक्षा राजेंद्र पवार (17,दोन्ही रा.भाट्ये खोतवाडी,रत्नागिरी) हिला घेउन कॉलेजला जात होती. या दोन्ही दुचाकी भाट्ये गावाकडे जाणार्या फाट्या समोर आल्या असता बुलेट चालक राजेश किरचा आपल्या दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक देत अपघात केला.
ही धडक इतकी जोरदार होती कि,त्यामुळे बुलेट चालक राजेश किर रस्त्यावर फेकला जाउन त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत होउन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळातच शहर पोलिस कर्मचारी आणि माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भाटकर आणि स्थानिक नागरिकांनी चारही जखमी यांना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. अपघातातील इतर तीन जखमींची प्रकृती स्थिर असून बुलेट चालक राजेश किर यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.