रत्नागिरी:- दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी कोसळलेल्या पावसात शहरानजीकच्या भाट्ये-खोतवाडी येथे आंब्याचे झाड घरावर कोसळून नुकसान झाले. या घटनेवेळी पतीपत्नी थोडक्यात बजावले. ग्रामस्थांनी तात्काळ धावपळ करीत मदत केली.
शहरानजीकच्या भाट्ये खोतवाडी येथे देवेंद्र देवकर यांचे घर असून, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंब्याचे मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळले. यावेळी घरमालक देवेंद्र देवकर व त्यांची पत्नी घरामध्ये होते. आंब्याचे झाड पडल्याने घरावरील पत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचे झाड कोसळले त्यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी माजी सरपंच पराग भाटकर, पप्या भाटकर, सुहास भाटकर, समीर भाटकर, राकेश भाटकर, मया भाटकर, प्रकाश भाटकर, संदेश भाटकर व झरी विनायक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाड बाजुला करण्यास मदत केली. या घटनेची माहिती तात्काळ तलाठी व शासकीय अधिकार्यांना देण्यात आली. यामध्ये सुमारे पन्नास हजारहून अधिक रुपयांचे देवकर यांचे नुकसान झाले आहे.