दुर्वास पाटील याला कठोर शिक्षा मिळावी यासाठी योग्य तपासाची केली मागणी
रत्नागिरी:- भक्ती मयेकरसह राकेश जंगम व सीताराम वीरची हत्या करणार्या क्रुरकर्मा दुर्वास पाटील याचे वेगवेगळे प्रताप समोर येत असतानाच भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांनी जंगम व वीर यांच्या घरी भेट देऊन भाजपा त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगिते. याप्रकरणात पाटील याला कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील काही दिवसापासून भक्ती मयेकर, सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ढवळून निघाला आहे. खंडाळा पंचक्रोशीमध्ये क्रुरकर्मा दुर्वास पाटील याच्या अनेक कारनाम्यांच्या आता चर्चा होऊ लागल्या आहेत. गोरगरीब लोकांना धमकावणार्या दुर्वास बद्दल आता खुलेआम चर्चा होऊ लागली आहे. भाजपाचे उत्तर रत्नागिरी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, वरवडेचे माजी सरपंच निखिल बोरकर, अमोल बैकर, सतिश हळदणकर, संकेत ढवळे यांनी शुक्रवारी राकेश जंगम व सीताराम वीर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
सीताराम वीर यांना मारहाण करुन, घटनेच्या दिवशी दुर्वास व त्याच्या सहकार्याने घराच्या पडवीत आणून टाकत त्यानंतर पळ काढला होता. शेजारीही या घटनेचे साक्षीदार आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत वीर यांच्या पत्नीचा जवाब पोलिसांनी नोंदवला असून या प्रकरणाचा योग्य तपास पोलिसांनी करावा यासाठी आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे विवेक सुर्वे यांनी सांगितले.
राकेश जंगम यांची आई वंदना जंगम यांचीही भेट घेऊन विवेक सुर्वे यांनी सांत्वन केले. यावेळी भाजपा पक्ष आपल्या पाठीशी असून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणात केलेल्या हलगर्जीपणाबद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.