रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सौ. राजश्री शिवलकर आणि त्यांचे पती बिपीन शिवलकर यांनी शिवसेना उपनेते डॉ. आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सक्रीय पदाधिकार्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धक्का बसला आहे.
भाजपचे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजितकुमार मिश्रा यांचा दौर होऊन दोन दिवस झाले नाहीत तो, भाजपमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपाच्या महिला शहर अध्यक्षा सौ. शिवलकर या माजी नगसेविका असुन मांडवी परिसरात शिवलकर पती-पत्नी यांचा चांगला प्रभाव आहे. बिपीन शिवलकर यांची काथ्या बोर्डातील महत्त्वाची जबाबदारीही भाजपकडून देण्यात आली होती. रविवारी शिवलकर पती-पत्नींनी उपनेते आमदार साळवींच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, युवासेना सदस्य पवन जाधव, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख शहर संजय साळवी, सुजित किर, विनय गांगण, हेमंत खातू, प्रसाद सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महेश पत्की यांच्यासह यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. शिवलकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार आहे. राज्यात भाजपची सत्ता असुनही सौ. शिवलकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांना धक्का बसला आहे. याप्रसंगी सौ. राजश्री शिवलकर यांनी रत्नागिरी शहराच्या सर्वांगिण विकास हे आपले ध्येय असुन शिवसेनेच्या माध्यमातून ते पूर्ण करणे शक्य आहे. भविष्यात त्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.









