काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रत्नागिरी:- देशातील निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून फेरफार केल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप गंभीर आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पीपीटी सादरीकरणाचा संदर्भ देत सय्यद म्हणाले की, ‘निवडणुकांमध्ये ‘मतचोरी’ केली जात असल्याचा राहुल गांधींचा दावा अत्यंत महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगावर करण्यात आलेले हे आरोप गंभीर असून, आयोगाने यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.’ राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमधील मतदार याद्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आल्याचेही सय्यद यांनी निदर्शनास आणले.
निवडणुकांच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना सय्यद म्हणाले, ‘पूर्वी भारतात एकाच वेळी मतदान होत होते, परंतु आता ही प्रक्रिया महिनोनमहिने चालते. यामुळेच अनेक शंका निर्माण होतात. निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून बदलले जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.’
यावेळी सय्यद यांनी महाराष्ट्रातील मतदारांशी संबंधित काही आकडेवारी दिली. त्यांनी सांगितले की, ‘गेल्या ५ वर्षांत जेवढे मतदार जोडले गेले नाहीत, तेवढे मतदार केवळ ५ महिन्यांत जोडले गेल्याचा संशय आहे. तसेच, कर्नाटकच्या महादेवपुरातील एका १० बाय १५ फुटांच्या घरात ८० मतदार नोंदणीकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घराचा संबंध भाजपशी असल्याचा आरोपही त्यांनी केला.’
सय्यद यांनी स्पष्ट केले की, ‘ही मतचोरी केवळ निवडणुकीतील घोटाळा नाही, तर संविधान आणि लोकशाहीशी केलेला विश्वासघात आहे.’ त्यांनी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले ५ प्रश्नही पुन्हा सांगितले, ज्यात डिजिटल डेटा का दिला जात नाही, निवडणूक फुटेज का हटवले जाते, मतदार यादीत घोटाळे का होतात, निवडणूक आयोग भाजपच्या एजंटसारखे का वागतो आणि विरोधी पक्षांना धमक्या का दिल्या जातात अशा गंभीर प्रश्नांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदींना सत्तेत राहण्यासाठी २५ जागांची गरज होती आणि त्यासाठी निवडणूक आयोग भाजपसोबत संगनमत करत असल्याचा आरोपही सय्यद यांनी केला. शरद पवार यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व नेत्यांनी राहुल गांधींच्या विश्लेषणाचे समर्थन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
अखेरीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार, राहुल गांधींचे हे सादरीकरण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात पोहोचवण्यासाठी जनजागृती अभियान राबवणार असल्याचे सय्यद यांनी जाहीर केले. ‘बॅनर्स, पोस्टर्स, निदर्शने आणि सभांच्या माध्यमातून आम्ही भाजप आणि निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करू,’ असे ते म्हणाले.