रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. १२) होणार आहे. त्यासाठी भाजपाची आज बैठक झाली. यामध्ये इच्छुकांपैकी माजी नगरसेवक समिर तिवरेकर यांची उपनगराध्यक्षपदी एकमताने निवड झाल आहे.
सोमवारी याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. तीन स्वीकृत नगरसेवकांचीही नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये भाजपाकडून बाबू सुर्वे तर शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी पुन्हा स्वीकृत म्हणून मागच्या दाराने पालिकेत दिसणार आहेत. तर युवा पदाधिकारी अभिजीत दुडये याचेही नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे.
महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये ठरलेलेल्या धोरणाप्रमाणे नगराध्यक्षपद शिवसेनेला तर उपनगराध्यक्षपद भाजपाला देण्यात आले आहे. त्यानुसार १२ जानेवारीला उपनगराध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. यासाठी भाजपामधुन राजू तोडणकर, समिर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे यांची नावे चर्चेत होती. जिल्हा समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात आले. राजू तोडणकर यांची गटनेते म्हणून निवड झाल्यामुळे समिर तिवरेकर यांना उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाने एकमताने निवड केली. समिर तिवरेकर उच्च शिक्षित अभ्यासू असल्याने त्यांनी यापूर्वी देखील शहरातील अनेक विषय लावून धरले आणि ते तडीस नेले आहेत. त्यामुळे समिर तिवरेकर यांची सोमवारी औपचारिकता म्हणून निवड होणार आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बाळू साळवी, भाजपाकडून नगरसेवक राजू तोडणकर, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून गटनेता म्हणून केतन शेटय़े यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपाकडुन आजच्या बैठकीतच स्वीकृत सदस्य म्हणून बाबू सुर्वे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर शिवसेनेकडुन माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी पुन्हा स्वीकृत म्हणून पालिकेत दिसणार आहेत. त्यांचे नावही निश्चित झाले असून शिवसेना युवा पदाधिकारी अभिजीत दुडये यांनाही पक्षाने संधी दिल्याचे समजते.









