रत्नागिरी:- न्यायालयाचा आदेश असूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांनी स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडले. या आंदोलनाला शुक्रवारी सकाळीच भंडारी समाजाचे नेते तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी तत्काळ भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला. रत्नागिरी तहसीलदार श्री म्हात्रे यांनी तत्काळ उपोषणस्थळी दाखल होत मंगळावर १९ ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या ताब्यासाठी रत्नागिरीकर आणि भागोजीशेठ यांच्या वंशजांनी स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. हे प्रकरण ‘भामभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ’ यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्या २४ फेब्रुवारी १९४४ रोजीच्या निधनानंतर त्यांच्या स्वसंपादित मालमत्तेचा ताबा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसीव्हरने घेतला होता. यावर २००४ साली निकाल लागला आणि दाव्यातील सर्व मालमत्ता वारसांना वाटप करून ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतरही काही मालमत्ता अजूनही वारसांना मिळालेली नाही. या विरोधात हे उपोषण छेडण्यात आले होते.
उच्च न्यायालयाच्या ताब्यातील दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या जागा उच्च न्यायालयाचा आदेश होऊनही अद्याप काही जागा त्यांच्या वंशजांच्या ताब्यात महसूल प्रशासनाने दिलेल्या नाहीत. महसूल प्रशासन उच्च न्यायालयाचा अवमान करीत असल्याच्या निषेधार्थ आज स्वातंत्रदिनी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि भागोजीशेठ कीर प्रेमी यांच्यावतीने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण करण्यात आले. रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असता न्यायालयाचा आदेश आणि पालकमंत्र्यांकडून निर्देश असूनही त्यांची कार्यवाही का केली नाही अशी विचारणा श्री रमेश कीर यांनी केली असता तात्काळ हा विषय मार्गी लावत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या विनंतीनुसार हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी भंडारी समाजाचे नेते रमेश कीर, भंडारी समाज अध्यक्ष राजीव कीर, सचिव चंद्रहास विलणकर, साईनाथ नागवेकर, विकास भाटकर, रमाकांत आयरे, मनोज भाटकर, संतोष ( बंटी ) कीर,कौस्तुभ नागवेकर, दिपक सुर्वे, जितेंद्र शिवगणं, संतोष चव्हाण, विनायक जोगले, विजय भाटकर, ओम कीर, सुरेंद्र घुडे, विठोबा नागवेकर, आदित्य वारंग, अमृता मायनाक, दिलीप भाटकर, सुनील पारकर, सद्गुरू नागवेकर, नंदू मोरे, गजेंद्र वारंग, उदय हातीसकर, संदेश नागवेकर आदी उपस्थित होते.