रत्नागिरी:- नागरिकांना रत्नागिरी शहरामध्ये जे काही अपेक्षित आहे ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे. कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. परंतु थोड्या पावसात दोन खड्डे पडले की त्याचे भांडवल करायचे, हे जे काही राजकारण सुरु आहे ते मतदारांनी ठेचून काढले पाहिजे. येथील मतदार मला आशिर्वाद देणारा आहे त्यामुळे कोणी कितीही बॅनर लावले आणि किती कोटी आणले म्हणून सांगितले तरी त्याचा मतदारांवर परिणाम होणार नाही असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत विरोधकांना सुनावले.
रत्नागिरी शहर परिसरात तब्बल 122 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दहा ठिकाणी जाऊन केला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व शहरात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, रत्नागिरीतील सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे, त्यामुळेच दर शनिवार, रविवारी आपण रत्नागिरीत येऊन लोकांमध्ये काम करीत असतो. लोकांमुळेच आपला आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत दीड लाख मतांनी विजयी होऊ असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला.
या मतदार संघात दोन टर्मच्यावर कोणी आमदार झाला नव्हता. परंतु जनतेने मला रेकॉर्ड करण्याची संधी दिली. चार वेळा निवडून दिले. येथील मतदार संघाला कधी नव्हे ते मंत्रिपद मिळाले. भविष्यात महाराष्ट्रात मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवताना पहिल्या तीन मताधिक्क्यांमध्ये विजयी व्हायचे आहे. हे सर्व आपल्यामुळे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले. विकास कामांची भूमिपूजन होणार्या काही कामाचे आचारसंहितेच्या आत उद्घाटनाचे भाग्य मला मिळू दे असे सांगतानाच चांगल्या दर्जाचे काम या ठिकाणी झाले पाहिजे असेही ना. सामंत यांनी ठेकेदारासह मुख्याधिकार्यांना स्पष्ट शब्दात स्टेजवरुन सांगितले. शहरातील विश्वनगर येथे गार्डन विकसित करणे, स्वा. सावरकर नाट्यगृहामागील आणि राजमाता जिजामाता उद्यानातील खाऊगल्ली विकसित करण्याच्या व उद्यान सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. याचवेळी महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जिजामाता उद्यानात उभारला जात आहे. अगदी भाट्ये समुद्र किनारा किंवा खाडीमधूनही या पुतळ्याचे दर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचा शुभारंभही ना. सामंत यांनी केला.
शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यानात 30 फूट उंच विठूरायाची मूर्ती उभारण्यात येत असून, त्याचाही शुभारं ना. सामंत यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यासह रत्नागिरीत मोठ्याप्रमाणात वारकरी सांप्रदाय व विठ्ठलाचे भक्तगण आहेत. त्यांना दर्शन व्हावे यासाठी ही मूर्ती उभारली जात आहे.
या विकास कामाबरोबरच आठवडाबाजार येथील शॉपिंग सेंटर विकसित करणे, काँक्रीटचे रस्ते यासह अनेक कामांचा शुभारंभ यावेळी ना. सामंत यांच्या हस्ते झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, मुख्याधिकारी तुषार बाबर, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिलाशहरप्रमुख स्मीतल पावसकर, माजी उपनगराध्यक्ष बाळु साळवी, रोशन फाळके, माजी नगरसेविका श्रध्दा हळदणकर, वैभवी खेडेकर, कौशल्या शेट्ये, सोहेल मुकादम, विजय खेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









