भविष्यात निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला

निलम गोऱ्हे ; सरकारला ५ वर्षे कोणताही धोका नाही

रत्नागिरी:- घटक पक्षांचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न एनडीए सरकार करत होते. त्याला रोखठोक उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी जन्माला आली. राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार मजबुत असून त्याला पाच वर्षे कोणताही धोका नाही. आम्ही भविष्यात हाच फॉर्म्युला वापरू, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत गोऱ्हे म्हणाल्या, केंद्र शासन महाराष्ट्र राज्याबाबत दुजाभाव करताना दिसत आहे. गुजरात राज्याला निधी दिला जातो, मात्र महाराष्ट्राला देण्यास टाळाटाळ होत आहे. आम्ही ग्वाही देतो की, केंद्राने जर आमचा ३५ हजार कोटीचा जीएसटीचा निधी दिल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३०० ते ५०० कोटीचा विकास निधी दिला जाईल. कोरोना महामारी, महापूर असो वा चक्रीवादळ यामध्ये ठाकरे सरकारने उत्तम काम केले आहे. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. महाविकास आघाडीमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे आम्ही ५ वर्षांचा कार्यकाल पुर्ण करू. एवढेच नव्हे तर भविष्यात हाच फॉर्म्युला वापरू.  

केंद्रा पाठोपाठ राज्यानेही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने केलेली कर कपात ही धुळफेक आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला आहे. याला उत्तर देताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना धुळफेक म्हणणे भाग आहे. मात्र त्यांनी याकडे लक्ष घालण्यापेक्षा रेल्वे मार्गावरील अतिक्रमणे अजून हटविण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्गात अनेक अडथळे निर्माण झाली आहे. त्याकडे लक्ष द्यावे. भाजपचे श्री. दानवे यांनी महाविकास आघाडी शासनावर केलेल्या टिकेला उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या, ते काही बोलतात त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.