रत्नागिरी:- नळपाणी योजना, रस्ते, तारांगण ही नियोजित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून भविष्यात रत्नागिरीच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी कला, क्रीडा, पर्यटनासह दर्जेदार प्रकल्प आणले जाणार आहेत. या माध्यमातून भारताच्या नकाशावरील विकसीत शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिली मंत्री सामंत यांनी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे रत्नागिरीकरांना पटवून दिले.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी (ता. 20) आयोजित विशेष कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. उदय सामंत यांनी सलग चौथ्यांदा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. दुसर्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्याचा उपयोग जिल्ह्याचा, रत्नागिरी मतदारसंघाचा आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कसा केला हे चित्रफितीद्वारे मांडले. बहूचर्चित रत्नागिरी शहराची पाणीपुरवठा योजना जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यातील जलशुद्धीकरण केंद्राचे काम 80 टक्के झाले आहे. जवळपास 150 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. पानवल आणि शिळ धरणातून शहराला दररोज 15 एमएलडी पाणी पुरवले जाते. धरणातून आणलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुध्द करतात. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली असून पाण्याची शुध्दता प्रचलित भारतीय मानांकनानुसार आहे. नव्या योजनेमुळे शहराला मुबलक आणि चांगल्या दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
शहरातील खराब रस्त्यांमुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पण गॅस पाईपलाईन, पाणीपुरवठा योजनेची लाईन, भूमीगत विजवाहिन्यांची खोदाई यामुळे रस्त्यांची कामे रखडली. या काळात पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली, पण पावसामुळे त्यात अडचणी आल्या. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि विशेष रस्ता अनुदानांतर्गत 112 कामांना मंजुरी मिळाली असून 76 कामे पूर्ण झाली तर 36 कामे प्रगतीपथावर आहेत. शहरातील 80 फुटी रस्त्याचे काँक्रिटीकरणही प्रस्तावीत आहे.
जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव रत्नागिरी पालिकेच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारला जाणार आहे. त्यासाठी 15 कोटीचा निधी पालिका देणार आहे. तलावाची लांबी 50 मीटर तर रुंदी 25 मीटर असेल. जागतिक दर्जाचे जलतरणपटू निर्माण व्हावेत या उद्देशाने ही योजना राबविली जात आहे.