भल्या पहाटे झालेल्या स्फोटात स्लॅब खाली अडकलेल्या दोन महिलांचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक शेट्ये नगर येथे एका घरात बुधवारी पहाटे पाच वाजता अचानक स्फोट झाला आणि संपूर्ण रत्नागिरी हादरली. स्फोट झाल्यानंतर घराचा स्लॅब कोसळून दोन महिला या स्लॅब खाली गाडल्या गेल्या होत्या. या महिलांना वाचवण्यासाठी तब्बल दोन तास अथक प्रयत्न सुरू होते. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत जखमी चौघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्फोट झालेले घर रिक्षा चालक अश्फाक काझी यांचे आहे. काझी बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे उठले आणि घरातील लाईट चालू केली असता घरात मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की घराचा स्लॅब पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला तर आजूबाजूच्या घरांचे दरवाजे आणि काचा देखील फुटल्या.

या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळल्याने घरातील कनिज काझी, नुरुनिसा अलजी दोन महिला या स्लॅब खाली अडकल्या होत्या. मानवी मदतीने या महिलांना स्लॅब खालून बाहेर काढणे शक्य नसल्याने क्रेन बोलावण्यात आली. क्रेन च्या मदतीने दोन तास बचावकार्य सुरू होते. मात्र या दरम्यान स्लॅब खाली अडकलेल्या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. हा स्फोट नेमका सिलेंडरमुळे झाला की अन्य कशामुळे याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.