रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेत असलेले एटीएम मशीन फोडण्याचे धाडस चोरट्यानी केले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. शहर पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील बाजारपेठ येथे धनजी नाका ते मच्छीमार्केट रोडवर एका बँकेचे एटीएम आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.अर्धवट मशीन फोडण्यात चोरटे यशस्वी झाले मात्र एटीएम मधील रोकड चोरट्यांच्या हाती लागली नाही.
शुुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. एटीएमच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही असल्याने ज्यांनी हे कृत्य केले ते लवकरच पकडले जातील. असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केली आहे.