भरधाव लक्झरीच्या धडकेत मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी येथील चुकीच्या डायव्हर्शनमुळे अपघात

संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावर शिंदेंआंबेरी नजिक गुरुवारी रात्री अकरा वाजता सावंतवाडीकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या वेतोबा ट्रॅव्हल्सची लक्झरीने चिपळूणहून संगमेश्वर कडे जाणाऱ्या मोटर सायकलला जोरदार धडक देत उडवले. यात मोटरसायकलस्वार हा गंभीर जखमी झाला.

गुरुवारी रात्री अकरा वाजता सावंतवाडीहून मुंबईकडे जाणारी लक्झरी( MH-48- DC- 9439) ने शिंदेंआंबेरी नजिक आरवली घाटात डायव्हर्जनचे योग्य नियोजन नसल्याने चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या मोटरसायकलस्वारास जोरदार धडक देत उडवले. यात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला.

त्याचवेळी चिपळूणकडून येणारे तुरळ येथील विक्की आंबूर्ले यांनी ही घटना पहिली व घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जितेंद्र चव्हाण यांना फोन केला. जितेंद्र चव्हाण व मिलिंद चव्हाण तसेच चैतन्य परकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संगमेश्वर येथील खाजगी रुग्णवाहीका बोलावून व पोलिसांना खबर देत सदर जखमीस डेरवण येथे दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे हे ही तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

गाडीमध्ये ३५ प्रवासी होते. श्री नागरगोजे यांनी सदर प्रवाशांची पुढच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी लक्झरी मालकास संपर्क करून रात्री २ वाजता हे सगळे प्रवासी मुंबईकडे रवाना केले. सदर लक्झरी बस चा चालक आर्यन अवधूत भेरे (वय 23) रहाणार आरवली वेंगुर्ला हा फरार झाला आहे.

आरवली येथे डायव्हर्शनचे माहिती फलक लावले नसल्याने वाहन चालक दोन्ही बाजूने कसेही येजा करत होते. डायव्हर्शनचा फलक नसल्याने मोटरसायकलस्वार चुकीच्या दिशेने आत घुसला व भरधाव येणाऱ्या बस ने त्याला उडवले. अपघात झाल्यानंतर उपस्थित तरुणांनी पोलिसांच्या सहाय्याने आरवली येथे फलक लावले. ठेकेदारांच्या गलथान कारभाराबाबत उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.