खेड:- खेड ते दापोली रस्त्यावर बहिरवली फाट्याजवळ एका भरधाव डंपरने एसटी बसला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, एसटी चालकाने एका दुचाकीस्वाराच्या मदतीने पाठलाग करून डंपरला पकडले. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
रमेश योगाजी कामेटे हे एसटी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल-२५८०) घेऊन खेडहून दापोलीकडे जात होते. दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास बहिरवली फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका पांढऱ्या-लाल रंगाच्या डंपरने (क्रमांक एम.एच.०८-डब्ल्यू-८२०५) एसटी बसच्या ड्रायव्हर बाजूकडील भागाला घासून जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरचालकाने न थांबता वेगाने पळ काढला.
एसटी चालकाने प्रसंगावधान राखून एका दुचाकीला थांबवले आणि त्याच्या मदतीने डंपरचा पाठलाग सुरू केला. डंपरचालक तिसे रोडकडे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पाठलाग करत पुढे जाऊन एसटी चालकाने डंपरला थांबवले. या अपघातात संकेत सुभाष जगताप (वय २६) आणि सोनाली संकेत जगताप (वय २४) हे पती-पत्नी जखमी झाले आहेत.
या प्रकरणी एसटी चालक रमेश कामेटे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ) सह मोटार वाहन कायद्याच्या १८४, १३४(अ), (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









