खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथील जुन्या कोल्हापूर गॅरेजसमोर (जिओ पेट्रोल पंपाजवळ) सोमवारी दुपारी २:४५ च्या सुमारास एक भीषण आणि विचित्र अपघात घडला. एका भरधाव कारने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानंतर, पुढे असलेल्या अल्टो कारला आणि त्यानंतर एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या साखळी अपघातात टेम्पो चालक आणि दुचाकीस्वारासह दोघे जण जखमी झाले आहेत.
फिर्यादी अशपाक शेख महमंद शेख (वय २९) हे आपल्या टेम्पोमध्ये सिमेंटच्या १० गोण्यांची डिलिव्हरी देऊन सुकिवलीच्या दिशेने परतत होते. टेम्पो गरम होत असल्याने ते रस्त्याच्या कडेने सावकाश गाडी चालवत असताना, पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने (समिऑन कार) टेम्पोला जोरात धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो उजव्या बाजूला पलटी झाला आणि घासत जाऊन कच्च्या रस्त्यावरील गवतात थांबला.
टेम्पोला धडक दिल्यानंतरही कार थांबली नाही. कार चालकाने पुढे जाणाऱ्या एका अल्टो कारला (MH 08 AN 5903) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अल्टो कार मधील दुभाजक (डिवायडर) ओलांडून विरुद्ध दिशेच्या (गोवा-मुंबई) मार्गिकेवर गेली. तिथे या कारने एका ॲक्टिव्हा स्कुटरला धडक दिली.
या अपघातात अशपाक शेख, चिराग चंद्रकांत घडशी, गणपत उर्फ आप्पा पांडूरंग घोले हे जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालक केतन महेंद्र चव्हाण (वय ३९, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









