खेड:- खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीने डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH 08 X 6295 ही खेडच्या दिशेने जात असताना पुढे असलेल्या डंपर क्रमांक MH 11 DV 7474 ला पाठीमागून धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली 24 तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणीज धाम यांच्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमीला तातडीने प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. या अपघातात अक्षय संतोष जाधव (वय 35, रा. भरणे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.









