भरणेनजीक रिक्षा उलटून चौघे जखमी

खेड:- उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईहून राजापूरला येणाऱ्या चाकरमान्यांची रिक्षा उलटून चौघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, हेमंत पवार यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

भिकू बापू बडवे (७५), सुभाष भिकू बडवे (३४), संगीता भिकू बडबे (६५), शिवंश सुभाष बडवे (५, सर्व रा. मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. सुभाष बडबे हे एम.एच.०२/एफ.एल. ३७३१ क्रमांकाच्या रिक्षातून आई-वडील व मुलग्याला घेवून राजापूरच्या दिशेने काजात होते. झोप अनावर झाल्याने भरणेनजीक रिक्षावरील ताबा सुटून ती उलटली. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक पोलीस व मदतकर्त्यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.