रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील पाट्याची अमिना-आयशा नावाची होडी मिरकरवाडा बंदरातून वायंगणी भागात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून ही होडी रविवारी रात्रीच्या सुमारास परतत असताना भगवती किल्ला येथे समुद्राच्या पाण्याच्या लाटेच्या तडाख्यात सापडली. पाण्याला मोठ्या प्रमाणावर करंट असल्याने ही होडी समुद्रात बुडाली. यावेळी या होडीवर आठ खलाशी होते.
बोट बुडाल्यानंतर होडीतील आठ खलाशांनी तासभर पोहत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथूनच येणाऱ्या ६ खलाशांना समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका बोटीने वाचविले. तर दोन पागी समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. त्यातील एक पागी मृतावस्थेत पांढरा समुद्रकिनारी सापडला असून एकजण अद्यापही बेपत्ता आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार शब्बीर अल्लीसाब मजगावकर (रा. कर्ला, रत्नागिरी) यांची अमिना -आयशा बोट दुपारी साडेचारच्या सुमारास मिरकरवाडा बंदरातून वायंगणी समुद्राच्या पाण्यात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीवर शब्बीर मजगावकर यांच्यासह तांडेल अब्दुल रशिद अलिसाहेब मजगांवकर (वय ३५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी), फैज अब्दूलमजीद बुडीये (वय ३९, रा. कर्ला, रत्नागिरी) इम्तीयाज मिरकर (३६ रा. राजिवडा, रत्नागिरी), विनोद हिरु धुरी (वय ६३, रा. मांडवी बंदर रोड, रत्नागिरी), रबिजोल इस्लाम चौधरी (वय २१, रा. मुळ ः आसाम), जियाउद्दीन लष्कर (वय २०, मुळ ः आसाम), एनामुद्दीन हसन ( वय २४, मुळ आसाम) असे सर्वजण मिळून अमिना-आयशा बोटीतून मच्छीमारी करण्यासाठी वायंगणी बाजूच्या दिशेने मासे पकडण्यासाठी समुद्रातून बोट घेवून गेले होते. त्या ठिकाणी मासे पकडून झाल्यानंतर सर्वजण पुन्हा परत मिरकरवाडा जेटी येथे परत जाण्यासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास येत असताना भगवती किल्ला जवळील ब्रेकवॉटर चे टोकावर आल्यावर समुद्रातील पाण्याची एक मोठी लाट आल्याने त्या लाटेवरुन अमिना-आयशा बोट सायंकाळी सातच्या सुमारास उलटली. बोट उलटल्यानंतर बोटीवरील खलाशांनी जीव वाचविण्यासाठी बोटीवरील ८ खलाशांनी समुद्राच्या पाण्यात उड्या घेतल्या पोहण्यास सुरवात केली. बोट पाण्याखाली जात असताना खलाशांनी आरडा-ओरडा केला पोहण्यास सुरवात केली. त्यावेळी समुद्रात असलेल्या एका बोटीने ६ जणांना आपल्या बोटीवर घेतले, वाचविले. पण यामध्ये दोन पागी विनोद धुरी व एनामुद्दीन हसन हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाला.
या प्रकरणी अमिना-आयशा बोटीचे मालक शब्बीर अल्लीसाब मजगावकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस बेपत्ता पागींचा शोध घेत असताना सोमवारी (ता. ८) दुपारी पांढरा सुमद्र येथे विनोद धुरी यांचा मृतदेह सापडला. मात्र पागी एनामुद्दीन हसन अद्यापही बेपत्ता आहे.